नागपूर : स्वायत्त असणारा निवडणूक आयोग सध्या पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. सत्ताधाऱ्यांबाबत निवडणूक आयोग मवाळ भूमिका घेत आहे. तर, विरोधकांबाबत कठोर भूमिका घेत असल्याचाही थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे आम्ही म्हटले होते. निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडायला हवी. पण तसे दिसत नाही. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा भाजपने स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने भाजपला कितीही मदत केली तरी जनता भाजपला हरवणार आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे अशक्य असल्याची चर्चा पाच वर्षांपूर्वी सुरू होती. मात्र, काँग्रेसने हा समज आता मोडीत काढला आहे. मोदींना काँग्रेसनं राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त केलं असून आज तुमच्यापुढे जो दिसतोय, तो केवळ पोकळ सांगाडा आहे. आणखी १५-२० दिवसांत तोही कोसळणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
> बेरोजगारी हाच या लोकसभा निवडणुकीचा मुद्दा
> लष्कर हे सगळ्या देशाचे असते. सैन्याने केलेल्या कारवाईचे राजकीयकरण अयोग्य
> जवळपास अर्धी निवडणूक संपली आहे. भाजप लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहे
> आमच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गीयांसाठी बऱ्याच गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत
> शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, रोजगार हे मुख्य प्रश्न आहेत.
> सुप्रीम कोर्टात राफेल करारवर सुनावणी सुरू आहे. यावर प्रक्रियेवर मी वक्तव्य केले होते. त्या चुकीसाठी माफी मागितली.
> राफेल करारात चौकिदारने चोरी केली असून अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला.
> चौकिदार चोर है वर मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, भाजपची नाही
> रोजगार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी १० मिनिटे वादविवाद करण्याचे आव्हान
अधिक वाचा : कुलरच्या शॉकने तरुणाचा मृत्यू