नागपूर : भंडारा मार्गावरील महालगाव कापसी येथील प्लास्टिक कारखान्यात मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. कारखान्यायाशेजारी असलेल्या डीपीतून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीराम प्लास्टिक असे या कारखान्याचे नाव आहे. या कारखान्यात टाकावू प्लास्टिकपासून प्लास्टिक चिप तयार करण्यात येत होती. सतराम पारवानी यांच्या मालकीचा हा कारखाना होता. सोमवारी रात्री या कारखान्यातील मजूर काम करून निघून गेले. त्यानंतर सकाळी कारखान्यात असणाऱ्या चौकीदाराला ही आग दिसली. त्याने लगेच ही माहिती कारखाना मालक व संबंधितांना दिली. अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच सुगतनगर, लकडगंज, सक्करदरा आणि सिव्हिल लाइन्स स्थानकातून दोन वॉटर ब्रॉऊजर्स आणि पाण्याचे चार बंब रवाना करण्यात आले. त्यानंतर आग विझविण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत ही आग जवळपास आटोक्यात आली. परंतु, प्लास्टिकचा कारखाना असल्याने आग भडकू नये म्हणून घटनास्थळावर दोन बंब ठेवण्यात आले होते. या कारखान्याशेजारी दुसरे कारखाने नसल्याने तसेच मोकळे मैदान असल्याने, रहिवासी भाग दूर असल्याने आगीचे स्वरूप सीमित झले. या आगीनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने केलेल्या कार्यामुळे किमान १५ लाखांचे नुकसान वाचल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानानंतर शहर व शहराबाहेर आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरापेक्षा शहराबाहेरील घटनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अग्निशमन पथकाला सजग राहावे लागत आहे. उन्हाळ्यातच आगीच्या घटना वाढत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.
अधिक वाचा : जापान की जिका टीम पहुंची नागपुर, नाग नदी को करेगी प्रदूषण मुक्त