नागपूर : तरुणींना प्रभावित करण्यासाठी मोबाइल चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला पाचपावली पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून अटक केली. पप्पू श्यामलाल बुरडे (वय २०, रा. लाल दरवाजा, बंगाली पंजा), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कमाल चौकातील विजयवाला कपड्याच्या दुकानातून एका ग्राहकाचा मोबाइल चोरी झाला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. सुरोशे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हेडकॉन्स्टेबल राजू अवस्थी, गजानन निशितकर, मिलिंद जगताप, शिपाई विजय लांडे, विकास सिंग, सचिन सोनवाने, लंकेश रनदिवे हे शनिवारी रात्री गस्त घालत होते.
वैशालीनगर भागात एक युवक संशयास्पदस्थितीत फिरताना पोलिसांना दिसला. त्यालाही पोलिस दिसले. तो पळायला लागला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्याला अटक केली. चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे १२ मोबाइल जप्त केले. पप्पू याला दारुचे व्यसन आहे. मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी मोबाइल चोरी करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
अधिक वाचा : निवडणुकीनंतरही मनपात शुकशुकाट