नागपूर : राज्य राखीव पोलिस दलातील जवानाचा भाऊ महागडे अमलीपदार्थ एमडीच्या तस्करीत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आली. तस्करीची खेप देताना पोलिसांनी तस्कराला रंगेहात अटक करून ४५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम एमडी जप्त केले. सिव्हिल लाइन्समधील सीपी अॅण्ड बेरार शाळा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. अमन मधुकर मसराम (वय २३,रा. एसआरपीएफ कॅम्प, हिंगणा रोड),असे अटकेतील तस्कराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन याचा भाऊ राज्य राखीव पोलिस दलात आहे. अमन हा बँकेत काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी बँकेने त्याला काढले. त्यानंतर तो नागपुरातील एका तस्कराच्या संपर्कात आला. बेरोजगार असल्याचे त्याने तस्कराला सांगितले. ग्राहकांना एमडीची खेप पोहोचविण्याची जबाबदारी तस्कराने अमनवर सोपविली. तेव्हापासून अमनही तस्करीत सक्रिय झाला. सदर भागात एमडीतस्कर खेप पोहोचविण्यासाठी येत असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली. पोलिस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजू बहादुरे, सहायक निरीक्षक शशिकांत पाटील, अविनाश तायडे, अजयसिंग ठाकूर, संतोष ठाकूर विनोद मेश्राम, नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन शेलोकर, अमोल पडधान, कुंदा जांभुळकर यांनी सिव्हिल भागात सापळा रचला. अमन हा तेथे येताच पोलिसांनी त्याला एमडीसह अटक केली. त्याला एमडीचा पुरवठा करणाऱ्या तस्कराचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
अधिक वाचा : नागपुरात एकाच कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या