नागपूर : शहरातील डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर अंबाझरी पोलीसांनी ही कारवाई केली. महत्वाचे म्हणजे, डॉक्टरांना खंडणी मागणाऱ्या आरोपींमध्ये त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
राज्याची उपराजधानी आणि गुन्हे जगताची राजधानी अशी ओळख असलेल्या नागपुरात आता खंडणीचे प्रकार देखील समोर यायला लागले आहेत. त्यामुळे नागपुरातील डॉक्टरही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे डॉक्टर चौधरी यांचे क्लिनिक आहे. ते स्वतः सर्जन असून त्यांच्या पत्नी पॅथॉलॉजी लॅब चालवतात.
चौधरी दाम्पत्याला ९ फेब्रुवारीला एका निनावी पत्राव्दारे ५० लाख रुपयाची खंडणीची मागणी करण्यात आली. तेव्हा या दाम्पत्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेचा तपास करत खंडणी मागणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये डॉक्टराच्या लॅबमध्ये काम करणारा एक कर्मचारीही सामील आहे.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर ६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात