नागपूर : अंदमान एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मवर चार्जिंग पाँइंटवर लावलेले चार मोबाईल चोरून नागपूर – भुसावळ पॅसेंजरने पळून जात असताना आरपीएफच्या पथकाने चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. अनिल महेश कुशवाह (३०, रा. झाशी, उत्तरप्रदेश) असे अटकेतील मोबाईल चोरट्याचे नाव आहे.
छेरकाडी बलोदा बाजार, छत्तीसगढ निवासी नरेंद्र चद्राकर (१९) याला नागपूर ते सिकंदराबाद असा प्रवास करायचा होता. मात्र, गाडीच्या प्रतीक्षेत तो प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर थांबला. त्याने मोबाईल चार्जिंगवर लावला. रात्रीची वेळ असल्याने त्याला झोप लागली. ही संधी साधून अनिलने चार्जिंगवरील मोबाईल चोरून नेला. नरेंद्रला जाग आली त्यावेळी मोबाईल नव्हता. त्याने विचारपूस केली मात्र, कोणीच काही सांगितले नाही. लगेच तो आरपीएफ ठाण्यात आला. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. लगेच सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी एक व्यक्ती मोबाईल चोरून नेत असल्याचे स्पष्ट झाले.
स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमचे अर्जुन सामंतराय, कामसिंग ठाकूर, दिनेश ठमके हे पहाटे आरोपीच्या शोधात निघाले. त्यांनी नागपूर स्थानक पिंजून काढले. अखेर एक व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर थांबलेल्या नागपूर – भुसावळ पॅसेंजरमध्ये संशयास्पद आढळला. चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला आरपीएफ ठाण्यात उपनिरीक्षक सीताराम जाठ यांच्या समक्ष हजर केले. त्यांनी विचारपूस केली असता अंदमान एक्स्प्रेसमधून तीन आणि प्लॅटफॉर्म एक असे एकूण चार मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून चार मोबाईल जप्त केले. आरपीएफने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करीत आहेत.
अधिक वाचा : फेसबुक मित्राचे ब्लॅकमेलिंग: अश्लील व्हिडीओ तयार करून आठ लाख लुबाडले