नागपूर : डझनभर टोल गेट्स, पैसे भरण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, असे चित्र नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दिसणारच नाही. तुम्हाला जिथे या रस्त्याहून बाहेर पडायचे, टोल गेट तिथे असेल. त्यामुळे नागपूरच्या जामठ्याहून सुटलेली तुमची गाडी कुठेही न थांबता थेट भिवंडीपर्यंत सुपरफास्ट धावू शकते. नागपूर ते औरंगाबाद अंतर तर अवघ्या तीन तासांत कापले जाणार आहे.
समृद्धी महामार्गाची निर्मिती, त्यावर आकारला जाणारा टोल यावरून राज्यभरात वेगवेगळ्या चर्चा झडत असतात. या सगळ्या प्रश्नांबाबत ‘मटा’ने रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनाच विचारणा केली, तेव्हा त्यांनी समृद्धीचा पट उलगडला. मोपलवार रामझुलाच्या उदघाटनासाठी नागपुरात आले होते. ते म्हणाले, ‘तुम्ही नागपूरहून औरंगाबादला निघालात तर तुमच्याकडून टोलचे पैसे थेट औरंगाबादमध्येच घेतले जातील. रस्त्यात कुठेच तुम्हाला थांबण्याची गरज नाही. तुम्ही जामठ्याहून जेव्हा समृद्धी महामार्गास लागाल तेव्हा तुमचे वाहन रजिस्टर होईल. तुम्ही जिथे कुठे हा रस्ता सोडाल, तेथवरचे अंतर मोजले जाईल आणि रस्त्याहून बाहेर पडले की, तुम्हाला टोल आकारला जाईल. तुमच्या वाहनाला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन चिप असेल तर मग कुठेच थांबायची गरज नाही. केंद्र सरकारने वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना असे तंत्रज्ञान बंधनकारक केले आहे.’
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दर किलोमीटरमागे २ रुपये ८४ पैसे इतका टोल लागतो. समृद्धीसाठी तो १ रुपया ८४ पैसे प्रति किलोमिटर इतका असेल. प्रत्येक तीन वर्षांनी त्यात १८ टक्के इतकी वाढ होईल. समृद्धी महामार्गावरून जाताना वाहनधारकांना पुढची ४० वर्षे टोल द्यावा लागेल. प्रकल्पाची किंमत त्याआधीच भरून निघाली तर टोल घेणे थांबवले जाईल’, असेही मोपलवार यांनी स्पष्ट केले..
‘रस्त्यासाठी लागणारी सगळी जागा आज आमच्या ताब्यात आहे. ९० टक्के लोकांना पैसे मिळाले आहेत. दहा टक्के जे राहिले, त्यातील काहींचे कौटुंबिक वाद आहेत. काहीजण उपलब्ध नाहीत. त्या सगळ्यांचे पैसे तहसीलदारांकडे पोहोचले आहेत. ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना दिले जातील. सिमेंट काँक्रिटचा हा रस्ता गतीने तयार होईल. इगतपुरीपर्यंतचा रस्ता २०२०मध्ये तर भिवंडीपर्यंतचा रस्ता २०२१पर्यंत पूर्ण होईल. जमीन अधिग्रहणाचे प्रश्न सुटले आहेत. १६ काँट्रॅक्टर्स कामास लागले आहेत. जवळपास ३०० किलोमीटर्सचा रस्ता तर आताही निर्विघ्न दिसतो आहे. या रस्त्याला ३ ते ९ मीटर्स उंचीची भिंत असेल, त्यामुळे कुठलेही जनावर, आगंतुक, वाहनाच्या वेगास अडथळा आणू शकणार नाहीत. वाहने किमान ८० तर कमाल १५० कि.मी. प्रतितास या वेगाने धावतील.
समृद्धी कमी खर्चात
महामार्गाला लागणारा अपेक्षित खर्च ५५ हजार ३३२ कोटी रुपये इतका आहे. प्रत्यक्षात हे काम ४२५०० कोटी रुपयांमध्येच होऊ शकेल, असा अंदाज मोपलवार यांनी व्यक्त केला आहे. ३५ हजार कोटी रस्ता बांधण्यासाठी आणि ७५०० कोटी जमीन अधिग्रहणासाठी लागणार आहेत. कर्जावरील व्याज राज्य सरकार भरणार आहे.
कोलकातापर्यंत..
महाराष्ट्रात समृद्धी मार्ग नक्कीच यशस्वी होईल. तो पुढे कोलकत्यापर्यंत पुढे जाऊ शकतो, अशी अपेक्षा मोपलवार यांनी व्यक्त केली. गोंदियापर्यंत डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तेथून पुढे या रस्त्याला भारत सरकारकडून पूर्णत्वास नेले जाऊ शकेल.
१९ टाउनशिप निश्चित
समृद्धीच्या शेजारी रस्ते विकास महामंडळाला २४ टाउनशिप उभारायच्या होत्या. त्यापैकी १९ ठिकाणे निश्चित झाली आहेत. नोटिफिकेशन निघाले आहे. सहा ठिकाणच्या सक्षमतेचा अभ्यास सुरू आहे. लॅण्डपुलिंग तत्त्वावर हे काम होणार आहे.
आठ लाख झाडे लावणार
रोड काँग्रेसच्या नियमांप्रमाणे एक कि.मी. रस्त्यासाठी ५८३ झाडे लावली पाहिजे. समृध्दीच्या निमित्ताने किलोमिटर मागे ६६३ झाडे लावली जात आहेत. समृध्दीसाठी ५४४ हेक्टर वनजमीन घेतली आहे, त्या बदल्यात ६०० हेक्टर जागा दिली आहे. ८ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. ही संख्या तोडलेल्या झाडांच्या तुलनेत दहापट आहे.
अधिक वाचा : ‘समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या’- शिवसेना