नागपूर : राज्य पोलिस दलातील ३१व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेला रविवार १३ जानेवारीपासून नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या यजमानपदाखाली सुरुवात होणार आहे. सुमारे तीन हजार खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोलिस विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे पोलिस दलात कार्यरत खेळाडू त्यांच्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे. पुरुष विभागातील खेळाडूंसाठी १६, तर महिला विभागात १२ क्रीडा प्रकार होणार आहे.
स्पर्धेबद्दल अधिक माहिती देतांना नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, २०१२ नंतर या स्पर्धांचे यजमानपद नागपूरला मिळाले आहे. यंदा स्पर्धेत सुमारे तीन हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यात एकूण आठ परिक्षेत्र, चार पोलिस आयुक्तालय व प्रशिक्षण संचालनालय अशा एकूण १३ संघ सहभागी होणार आहेत. पुरुष गटात ज्युदो, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, कुस्ती, वुशू, क्रॉसकंट्री, तायक्वांदो, हॉकी, फुटबॉल, हॅन्डबॉल, शुटिंग (वरिष्ठ अधिकारी), वॉकिंग (वरिष्ठ अधिकारी) यांचा समावेश असेल. महिलांसाठी ज्युदो, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, कुस्ती, वुशू, क्रॉस कंट्री आणि तायक्वांदो या स्पर्धांचा समावेश असेल असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचे उद्घाटन १६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप १८ जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत होईल. पत्रकार परिषदेला पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलिस आयुक्त बी. जी. गायकर आदी उपस्थित होते.
खेळाडूंना पुरस्कार
स्पर्धेतील पुरुष व महिला संघांना त्यांच्या कामगिरीवरून सर्वसाधारण विजेतेपद प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूला बाइक व मोपेडही प्रदान करण्यात येईल असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज नागपुरात