नागपूर : महिला उद्योजिका मेळाव्याच्या मंचावर विशेष मुले आली. परिधान केलेल्या कपड्यांवर त्यांनी स्वत: केलेल्या कलाकुसरीचे सादरीकरण फॅशन शो च्या माध्यमातून केले. विशेष मुलांनी सादर केलेला हा फॅशन शो बघून प्रेक्षकदीर्घेत उपस्थित असलेल्या महापौर नंदा जिचकार व महिला व बाल कल्याण समिती सभापती यांनाही राहावले नाही. त्यांनी थेट मंचावर जाउन विशेष मुलांचे कौतुक केले आणि त्यांना स्वरोजगारासाठी प्रोत्साहित केले.
निमित्त होते नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभाग यांच्या वतीने रेशीमबाग मैदानावर शहर समृद्धी अभियानांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे. मेळाव्याच्या चवथ्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मालेत पुष्प होते ते दिव्यांग तथा विशेष मुलांचा फॅशन शो चे. प्रयास संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी मंचावर येउन प्रेक्षकांना अभिवादन केले. विशेष म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवर प्रत्येकाने काहीना काही कलाकुसर केली होती. या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या दिव्यांचे प्रदर्शन दिवाळीच्या काळात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात लागले होते. या माध्यमातून या विशेष मुलांनी ५५ हजारांचा व्यवसाय केल्याची माहिती आयोजकांनी दिली. किरण दिवे संचालित प्रयासच्या या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
यानंतर इंटरनॅशनल अॅक्टने रसिक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. प्रख्यात मिमिक्री आर्टीस्ट ऐजाज खान यांनी मिमिक्रीच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेक्षकांना लोटपोट केले. भारतीय संस्कृतीतील विविध राज्यातील स्त्रियांच्या पेहरावांचा ‘ब्राईट्स ऑफ इंडिया’ फॅशन शो सादर करण्यात आला. तत्पुर्वी चवथ्या दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शहरातील प्रख्यात महिला वकील उपस्थित होत्या. महापौर नंदा जिचकार, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, अॅड. तेजस्विनी खाडे, कीर्तिदा अजमेरा, अॅड. शिल्पा गिरडकर, अॅड. वीणा मडावी चिमुरकर, वैशाली खाडेकर, इरा ख्रिस्ती, अॅड. कुलश्री भांगे, ज्योती वजानी, विनू चौरसिया, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या सरिता कावरे, मंगळवारी झोन सभापती गिऱ्हे, नगरसेविका मनिषा कोठे, वंदना भगत, सुमेधा देशपांडे उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाची मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘स्वातंत्र्य समता बंधुभाव, न्यायासाठी हाच आधार’ हा संदेश असलेला ‘बलून’ आकाशात सोडण्यात आला.
याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला संपूर्ण क्षेत्र पादाक्रांत करू शकतात. मात्र पुरूषांना मर्यादा आहेत. घरातली महिला उद्योजिका झाली तर मुलांवरही उद्योगाचे संस्कार पडतात. मेळाव्यात आलेल्या प्रत्येक उद्योजिकेने या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन जावी. अन्य महिलांनाही उद्योगासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अॅड. तेजस्विनी खाडे यांनी महिला अधिकार आणि महिलांसाठी असलेल्या कायद्यांबाबत विवेचन केले. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दहाही झोनमध्ये याबाबत कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील महिलांचा सत्कार
चवथ्या दिवशी पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. संगीत क्षेत्रात नावाजलेल्या संगीत शिक्षिका बीना चॅटर्जी, संस्कृत आणि मराठीतील तज्ज्ञ भारती सुदर्शन गोस्वामी, विविध उद्योगांच्या संचालिका महिला गोरक्षक अंजली वदीयार, सांदीपनीच्या मुख्याध्यापिका मल्लीका फैजुद्दीन आणि सुजाता मडावी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. चवथ्या दिवशी दुपारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये विजयी वर्षा काळींदे, माही चौधरी, आरोही कोटेजवार, आरव मेश्राम, अर्णव कारेमोरे यांना महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नगरसेविका मंगला खेकरे व वंदना भगत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अधिक वाचा : नागपूर में फैशन शो में रैम्प पर उतरे ‘दिव्यांग’