नागपुर : नागपुरात क्रीडा संस्कृती रुजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सव ला १२ जानेवारी रोजी प्रारंभ होत आहे. नियोजनाच्या आणि प्रवेशाच्या दृष्टीने संपर्क साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन रेशीमबाग येथील आई फाऊंडेशनच्या कार्यालयात मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेवक बाल्या बोरकर, सुनील मानेकर, डॉ. शरद सूर्यवंशी, ॲडविन ॲन्थोनी, राम वाणी, गुरुदेव नगरारे उपस्थित होते. फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूटही यामाध्यमातून होणार आहे. मागील वर्षी खासदार क्रीडा महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित या महोत्सवात यावर्षीही नागपुरातील प्रत्येक खेळाडूने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. जोशी यांनी केले.
क्रीडा सभापती नागेश सहारे म्हणाले, खेळाडूंना स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी यादृष्टीने विभागीय कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. या कार्यालयात प्रवेश अर्जही उपलब्ध आहेत. खेळाडूंच्या सोयीसाठी असलेल्या या कार्यालयाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला आयोजन समितीचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : नागपुर से शुरू होगी १४ फरवरी को समानता एक्सप्रेस