नागपूर : नवीन वर्षांच्या स्वागतासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावूनही एमआयडीसी आणि इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत दोन हत्या झाल्या, तर दोघांच्या खुनाचा प्रयत्न झाला. या घटनांनी नवीन वर्षांच्या स्वागताला गालबोट लागले आहे. या घटनांमधील आरोपी हे कुख्यात गुंड असून इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचे सदस्य तडीपार असताना शहरात दाखल झाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पहिली घटना इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. शुभम ऊर्फ सर्किट तायडे (२०), मुकुल ऊर्फ टिक्या पडोळे (१९), गिरीश देवराव वासनिक (३०), ऋषिकेश उईके (२२) सर्व रा. इंदिरानगर आणि त्यांचे दोन साथीदार हे नववर्षांच्या स्वागतासाठी मद्य प्राशन करून वस्तीत हुल्लडबाजी करीत होते. मद्यधुंद अवस्थेत ते जाटतरोडी परिसरातून जात असताना अचानक त्यांनी वस्तीत राहणारा अक्षय लेखराम वाघमारे (१९) रा. इंदिरानगर, जाटतरोडी याच्या घराच्या दरवाजावर लाथ मारली व जोरजोरात ओरडू लागले. अक्षयचा भाऊ आकाश ऊर्फ दीपक लेखराम वाघमारे (२५) याने दरवाजा उघडला व त्यांना दरवाजावर लाथा मारण्याचे कारण विचारले असता आरोपींनी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याने प्रतिकार केला असता त्याला ओढून नेले व राजू विशाल सांडील यांच्या घरासमोर त्याच्या पोटावर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. आकाशला मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गिरीश वासनिक याला अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
खुनाची दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात घडली. रंजीत ऊर्फ लडी रामप्रसाद धानेश्वार (१९) रा. राजीवनगर हा आपल्या कुटुंबासह घरासमोर छोटे लाऊडस्पीकर लाऊन नवीन वर्षांच्या स्वागतासाठी नाचत होते. त्या दरम्यान रात्री १२ वाजताच्या सुमारास वस्तीतील गुंड सचिन काळे, गोवर्धन लाला राऊत (२४), शंकर लाला राऊत (१९), नितेश काळे (२३), उमादास लिल्हारे (२०), मंगेश काळे (२६) आणि स्वप्निील काळे (१९) सर्व रा. राजीवनगर हे तेथे पोहोचले. अचानक ते त्यांच्यासोबत नाचू लागले. घरातील महिलांसमोर ते अश्लील हावभाव करून नाचत असल्याने रणजीतने त्यांना हटकले असता आरोपींनी त्याला दगड, विटा, फरशी आणि लाकडी दांडय़ाने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला, तर रणजीतच्या मदतीसाठी धावलेला सनी ऊर्फ नस्सू याच्याही खुनाचा प्रयत्न केला.
अधिक वाचा : नाकाबंदीदरम्यान मद्यपी वाहनचालकाने पोलिसाला उडविले