नागपूर : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या सुमारास न्यायालय परिसरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ऍड. दीपेश पराते यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात न्यायालयाच्या बाहेर एका वकिलावर प्राणघातल हल्ला झाला होता. या घटनेला अद्याप आठ दिवसही पूर्ण व्हायचे असताना परिसरात दुसरी घटना घडल्यामुळे विधी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
सदर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील बोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायाधीशांच्या एका निर्णयावरील नाराजीतून हा प्रकार घडला आहे. न्या. किरण देशपांडे कोर्टरूमच्या बाहेरून जात असताना ऍड. दीपेश पराते यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित वकील मंडळींना काहीच सुचले नाही. पराते यांनी न्यायाधीशांना थापड मारली. त्यानंतर त्यांचा चष्मा पडला. पण वेळीच काही लोक धावून आल्यामुळे थोडक्यात निभावले. काहीच वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. 28 नोव्हेंबर 2018 ला न्या. किरण देशपांडे यांनी पराते यांच्या वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात एक निर्णय दिला होता. या निर्णयावर पराते यांनी आपल्या मित्रांकडे नाराजीही व्यक्त केली होती.
मात्र, त्यांचा संताप वाढत गेला आणि त्यातूनच त्यांनी न्यायाधीशांना मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले. सदर पोलिस स्टेशन येथे आरोपीला नेण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये आरोपीचे नातेवाईक दाखल झाले, शिवाय वकिलांचीही या ठिकाणी गर्दी झाली होती. न्यायाधीशांना मारहाण केल्यानंतर ऍड. दीपेश पराते यांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलिस शिपायाने त्यांना रोखल्यामुळे ही घटना टळली. पोलिसांनी मात्र, वकिलाच्या आत्महत्येसंदर्भात आपण चर्चाच ऐकली असून निश्चित माहिती हाती आलेली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अधिक वाचा : पोलीस ठाण्यासमोर १३ वर्षीय मुलाला चिरडले