नागपुर : खासदार सांस्कृतिक महोत्सवात गीत, संगीत व नाट्य या क्षेत्रातील विविध दर्जेदार कार्यक्रम सादर झाले. नागपूरकर रसिकांनी त्याला भरभरुन प्रतिसादही दिला. हा सांस्कृतिक महोत्सव नागपूरच्या सांस्कृतिक जगताची नवी ओळख ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ईश्वर देशमुख महाविद्यालय येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, माजी खासदार दत्ता मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खासदार सांस्कृतिक महोत्सवात विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला नागपूरकर रसिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. देशातील विविध सांस्कृतिक प्रतिभेच्या सादरीकरणासाठी हा महोत्सव आगळावेगळा मंच ठरला आहे. या महोत्सवात आपली कला सादर करण्याची इच्छा अनेक नामवंत कलाकार व्यक्त करतात, हेच या महोत्सवाचे मोठे यश आहे. या महोत्सवाद्वारे विविध कलावंतांना प्रोत्साहन मिळत असून नागपूरकर रसिकांसाठी हा महोत्सव सांस्कृतिक मेजवानीच ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री श्री. गडकरी म्हणाले, खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकर रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. महोत्सवात अतिशय दर्जेदार कार्यक्रम सादर झाले. अनेक ख्यातनाम कलाकारांनी महोत्सवात हजेरी लावली.
नागपुरातील जवळपास 1 हजार कलाकारांनी यंदाच्या महोत्सवात सहभाग घेतला, हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. या महोत्सवाद्वारे नागपूरच्या अनेक कलाकारांना संधी व प्रोत्साहन मिळत आहे. नागपूरकर रसिकांसाठी हा महोत्सव आनंदाची पर्वणी ठरला असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. यानंतर महोत्सवात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ‘दुर्गा’ या नृत्य नाटिकेचे बहारदार सादरीकरण झाले.
अधिक वाचा : ‘झुंड’च्या सेटवर बिग बींची २०२२ च्या विश्वचषकाची तयारी