नागपूर : आसीनगर झोनमधील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी केले. महापौरांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी आसीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांशी भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, मोहम्मद इब्राहिम टेलर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, गणेश राठोड, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)सुनील कांबळे, जलप्रदाय विभागाचे मनोज गणवीर यांच्यासह ओसीडब्लूचे कर्मचारी व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहे. या जनता दरबाराच्या पूर्वतयारी म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी महापौरांनी आसीनगर झोनमधील परिसर, चंभार नाला, आदर्श नगर, खोब्रागडे नगर, यादव नगर, जयभीम चौक, रमाई उद्यान परिसर, वैशाली नगर, लष्करीबाग, ऑटोमोटिव्ह चौक, राणी दुर्गावती चौक या परिसराला भेटी दिल्या व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
आदर्शनगर व खोब्रागडे नगर येथील नाल्याकाठातील घरांना तेथील जनावरांचा त्रास होत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली. त्यावर महापौर नंदा जिचकार यांनी लवकरच समस्या सोडविण्यात येईल, असा विश्वास दिला. राणी दुर्गावती चौक ते ऑटोमोटिव्ह या दरम्यानच्या सीमेंटच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी लवकरच त्याबाबत प्रस्ताव तयार करून मला सादर करण्याचे निर्देश झोन सहायक आयुक्तांना दिले.
रस्त्याचा काही खचला आहे त्यावर डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी हॉटमिक्स विभागाला त्याबाबत अवगत करण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. जयभीम चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची डागडुजी करण्याचा प्रस्ताव नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी मांडला त्यावर महापौर नंदा जिचकार यांनी संमती दर्शवली.
यादव नगर येथील बौद्ध विहारात स्थानिक नागरिकांच्या वतीने महापौर नंदा जिचकार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक परिसरातील नागरिकांनी व महिलांनी महापौरांना आपल्या समस्या सांगितल्या. बोअरवेलच्या दुरूस्तीच्या कामाची तक्रार मोठ्या प्रमाणावर असल्याने महापौरांनी ओसिडब्लूच्या अधिका-यांना जाब विचारत खडेबोल सुनावले. बोअरवेल दुरूस्तीचे काम सात दिवसाच्या आत पूर्ण करण्यात यावे, नाही केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
वैशाली नगर येथील समस्या महापौरांनी जाणून घेतल्या. वैशाली नगरमधील झोपड्डीवासीयांची पाण्याची सोय, त्यांना स्थायी नळ कनेक्शन देण्याचे महापौरांनी कबुल केले. वैशाली नगरातील उघड्या नाल्याची समस्या व स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी लवकरात लवकर सोडविण्यात यावा, असे निर्देश आरोग्यअधिका-यांना दिले. वैशाली नगरात अतिक्रमणाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यादेखील लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
यांनंतर महापौरांनी घनोबा देवस्थान, पंचकुआ, बाळाभाऊ पेठ, टेका नाला, भिडवाई शाळेजवळचा परिसाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व समस्या प्राध्यानाने सोडविण्यात येतील, असे आश्वासन तेथील नागरिकांना दिले. महापौरांच्या भेटीने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्याने नागरिकांनी महापौरांचे आभार मानले.
अधिक वाचा :जागतिक दिव्यांग दिन : फुटाळा परिसरात स्वच्छता अभियान