नागपूर : बारमध्ये झालेल्या वादातून युवकाने अन्य एका युवकावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना त्रिमूर्तीनगरमधील भांगे लॉन परिसरात रविवारी मध्यरात्री घडली.
स्वप्नील श्रीकांत ठाकरे (वय २६),असे जखमी युवकाचे नाव आहे. तो खासगी काम करतो. प्रतापनगर पोलिसांनी अनोळखी युवकाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील व त्याचा मित्र अक्षय सुरेश लोथे (वय २६,रा.पोलिसनगर) दोघे प्रतापनगरमधील तन्मय बारमध्ये दारू पित होते. त्यांच्या टेबलाच्या बाजूला हल्लेखोर युवक साथीदारासह दारू पित होता. तो मोठमोठ्याने बोलत होता. स्वप्नीलने त्याला समजाविले. दोघांमध्ये वाद झाला. स्वप्नीलने थापड मारल्यामुळे युवक संतापला होता. रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास अक्षय व स्वप्नील मोटरसायकलने जात होते. युवकाने स्वप्नीलला आवाज दिला. अक्षयने मोटरसायकल थांबविली. युवकाने स्वप्नीलच्या पाठीवर व मांडीवर चाकूने सपासप वार केले व पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी स्वप्नीलला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर युवकाचा शोध सुरू केला आहे.
अधिक वाचा : मेट्रोच्या ट्रेलरने कामगारांना चिरडले