नागपूर : आर्थिकदृष्ट्या कमकुवत व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार वर्गातील बालकांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे अटल बालसंगोपन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचा लवकरात लवकर आढावा घेऊन पुढील कार्य सुरू करण्यात यावे, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी दिले.
मनपाच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे मंगळवारी (ता. २७) विविध विषयांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती प्रगती पाटील यांनी पाळघरासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीला उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, सविता कावरे, मनिषा अतकरे, वैशाली नारनवरे, उपायुक्त रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
दिवसभर कामावर जाणाऱ्या कामगार वर्गातील मुलांच्या संगोपनाचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. दिवसभर आई-वडील घरी नसल्याने या मुलांवर वाईट गोष्टींचा प्रभाव पडतो. अनेकदा ही बालके अत्याचाराचेही बळी पडतात. यावर नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेत या बालकांचे संगोपन व त्यांना संस्कारीत करण्यासाठी संगोपन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संगोपन केंद्रात शून्य ते ५ वर्ष वयापर्यंतची मुले व १३ वर्ष वयापर्यंतच्या मुलींना प्रवेश देण्यात येईल. संगोपन केंद्रासाठी काछीपुरा येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले.
१०० बालकांची क्षमता लक्षात घेऊन हे बाल संगोपन केंद्र सुरू करण्यात येत आहे. संगोपन केंद्रात दिवसभर राहणाऱ्या मुलांची एकवेळची खाण्याची व्यवस्था तसेच त्यांना दूधही देण्यात येणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले.
६ ते १३ जानेवारीदरम्यान महिला उद्योजिका मेळावा
नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने ६ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदानावर आयोजित या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये देशभरातील महिला उद्योजकांनी उभारलेल्या संकल्पना आमंत्रित करण्यात येणार आहे. विदर्भासह देशभरातील विविध महिलांनी संघटीत होउन सुरू केलेल्या व्यवसायांचे स्टाल मेळाव्याच्या परिसरात लावण्यात येणार आहेत. याशिवाय दिवसभर विविध कार्यशाळा, मार्गदर्शन कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी दिली.
अधिक वाचा : जर्मन शिष्टमंडळाचे महापौरांनी केले स्वागत : दोन दिवसीय कार्यशाळेत घेणार सहभाग