पुणे : गोळीबाराच्या घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. चंदननगरमधील आनंद पार्क येथे इंद्रायणी गृहरचना सोसायटीतल बुधवारी सकाळी अज्ञातांनी घुसून एका महिलेवर गोळीबार केला. या गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. तर, कोंढव्यातील येवलेवाडी येथे श्री गणेश ज्वेलर्स येथे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. यामध्ये देखील एक कर्मचारी जखमी झाला आहे.
एकता ब्रिजेश भाटी (वय ३८, रा. इंद्रायणी गृहरचना सोसायटी, आनंदनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भाटी या घरात असताना सकाळी नऊच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोळीबाराची माहिती समजताच चंदननगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसारीतल सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी हाती घेतले आहे. याप्रकरणी पतीकडे देखील चौकशी केली जात आहे. पण, ते जास्त बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चंदननगर परिसरात गोळीबाराचा प्रकार ताजा असताना दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवले वाडी येथील गणेश ज्वेलर्स दुकानात आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला. यावेळी आरोपींनी केलेल्या गोळीबारात दुकानातील एक कर्मचारी आम्रत परिहार (वय ३०) हा जखमी झाला आहे. चोरीच्या उद्देशानेच आरोपींनी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल आहे. मात्र, चोरट्यांना हाती काहीही लागलेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी धाव घेतली. जखमीवर खासगी रुग्णालयात उरचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या मागावर पथके गेली आहेत.
अधिक वाचा : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार – नितीन गडकरी