नागपूर : जुगार, मटका असे विविध अवैध धंदे चालवणाऱ्या कुख्यात गुंडाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बुधवारी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांतील साथीदारांनीच त्याला संपवल्याची माहिती आहे. संदीप ऊर्फ काल्या विकास गजभिये (२५) रा. मायानगर, इंदोरा असे मृताचे नाव आहे.
काल्याविरुद्ध मारहाण करणे, धमकावणे, जुगार, मटका अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या भावाचीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. मायानगर परिसरातील चॉक्स कॉलनी मैदान परिसरात ललित कला भवन आहे. या केंद्राच्या बाजूला त्याने टिनाचे छत्र टाकून जुगार व मटका अड्डा उघडला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे त्याच्या साथीदारांसोबत पैशांवरून भांडण सुरू होते. चार दिवसांपूर्वी काहींनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास काल्या हा आपल्या जुगार अड्डय़ात बसला होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांसह पुन्हा पैशावरून वाद झाला.
या वादातून चौघांनी मिळून त्याला मारहाण केली. तो झोपडीतून बाहेर पळायला लागला असता आरोपींनी त्याचा पाठलाग करून मैदानावर धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलीस नियंत्रण कक्षाला खुनाची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी मायानगर निवासी संभू घुबड आणि लंकेश या दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी गुन्हा कबूल केलेला नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत काल्या हा मायानगरशिवाय इंदोरा चौक मैदानातही त्याचा मटका व जुगार अड्डा चालतो. याशिवाय जरीपटका पोलीस ठाण्याच्या शेजारी मंगळवारी बाजार परिसरात एका झोपडीतही त्याचा अड्डा आहे. त्याच्या सर्व अवैध धंद्यांची माहिती जरीपटका पोलिसांना होती. मात्र, पोलीस त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत होते. अवैध धंद्यांकडे जरीपटका पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याची प्रतिक्रिया इंदोरा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
अधिक वाचा : नागपूर : मानलेल्या काकाने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार