नागपूर : छठ व्रत पूजेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर नागपुरातील नागरिक आस्थेने सहभागी होतात. हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा निमित्ताने मंगळवारी सायंकाळी हजारो उत्तर भारतीयांनी मावळत्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. या उत्सवात सहभागी झालेल्या बांधवांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या धार्मिक उत्सवातील स्वागत सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे,नगरसेविका रूपा राय, उमा तिवारी उपस्थित होत्या.
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या,अर्घ्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी नागपूर महानगरपालिका या धार्मिक सणासाठी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करते.महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची विशेष तरतूद या सणाकरिता करण्यात आली असल्याचे सांगत उत्सवात सहभागी झालेल्या सर्व भक्तांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी स्वागत केले.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, नागपूर महानगरपालिका छठ पूजा उत्सवाची संपूर्ण तयारी करीत असते. या उत्सवाचे पालकत्व नागपूर महानगरपालिकेने स्वीकारले आहे. बॅरिकेटिंग, विद्युत दिवे,ध्वनिक्षेपक आदी व्यवस्था दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चोखपणे करण्यात आली आहे.अग्निशमन विभागाचे जवान बोटींगद्वारे व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि यंत्रणा दिवसरात्र राबत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले आणि छठ पूजेमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. आर.मिश्रा यांचे स्वागत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे रजय पाठक, शैलेंद्र श्रीवास्तव, रुपम सिन्हा,दिनेश श्रीवास्तव, प्रशांत गुप्ता, कमलेश शर्मा, संजय पाठक, डॉ. विजय तिवारी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : उपराजधानी में छठ पूजा पर्व श्रद्धा और उत्साह से मनाया गया