अंबरनाथ : अंबरनाथ येथील प्रकाशनगर भागात एक वर्षाच्या चिमुकल्याने रॉकेल प्यायल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र रुग्णालयामधील डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप चिमुकल्याच्या कुटुंबाने केला आहे.
अंबरनाथ येथील पूर्व भागातील प्रकाश नगर भागात राहणाऱ्या अनिता शिंदे यांच्याकडे दिवाळीनिमित्त पुण्याहून त्यांची मुलगी भाग्यश्री सोनावणे ही आपल्या कुटुंबासह आली होती. मात्र रविवारी घरात खेळताना भाग्यश्रीचा एक वर्षाचा मुलगा कार्तिक सोनावने हा घरात खेळत असताना, जमिनीवर सांडलेले रॉकेल हाताद्वारे त्याच्या पोटात गेले होते. मात्र रविवार असल्याने शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णालयात उपचारासाठी नकार मिळाला होता. अखेर अंबरनाथ पश्चिम भागातील जियास या खासगी हॉस्पिटलमध्ये कार्तिक याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर काही वेळाने कार्तिक याची प्रकृती सुधारली.
परंतु सोमवारी सकाळी कार्तिक याच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने रुग्णालयामधील डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यास सांगितले होते. रुग्णवाहिका बोलावली. पण थोड्याच वेळात बाळाला रुग्णवाहिकेतून पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि नर्सने बाळाचा मृतदेहच हाती ठेवल्याचे कार्तिकच्या आजीने सांगितले. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कार्तिकची आजी अनिता शिंदे यांनी केला आहे. तर रॉकेलचा मोठा अंश बाळाच्या पोटात गेल्याने त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
और पडे : आरबीआई और मोदी सरकार में मतभेद , १९ नवम्बर को बोर्ड मीटिंग