नागपुर : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नाळ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही.
गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुधाकर यांनी सैराट, विहीर, देऊळ आणि वीरे दि वेडिंग सारख्या सिनेमांचे छायाचित्रीकरण केले असून नाळ मधून ते दिग्दर्शनातील पदार्पण करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार. दीप्ती देवी तसेच झी स्टुडिओज् चे सी.इ. ओ. शारिक पटेल, बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी, कन्टेन्ट हेड अश्विनीकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईजवळ आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची कथा आहे लहानग्या चैतन्यची असून चैतू आठ वर्षांचा आहे. नदीच्या काठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका दूरच्या खेड्यात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत जे चैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणाऱ्या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्या कथासूत्रात उलगडताना दिसेल. नाळ सारखा सिनेमा खऱ्या अर्थाने चित्रभाषेत बोलू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होईल यात शंका नाही.
मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी तसेच नागराज मंजुळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची प्रस्तुती आहे.चित्रपटाची कथा आणि पटकथा सुधाकर रेड्डी यांची असून, संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन संचारी दास मौलिक यांनी केलंय. सतीश पोतदार, प्रशांत देशमाने यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून अद्वैत नेमलेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेच चित्रपटातील वेशभूषा साकारली आहे सचिन लोवाळेकर यांनी. या चित्रपटातील ‘जाऊं दे न व’ ह्या गाण्याला तीन दिवसात १० लाख व्हियुज मिळाले असून हे गाणे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध तसेच शब्दबद्ध केले आहे आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प मधून अल्पावधीतच सर्वांचा लाडका झालेला जयस कुमारने हे गायले आहे. सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शनाबरोबरच छायाचित्रणातूनही चैतूचे भावविश्व चितारले आहे. चित्रपटात नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकर आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
पहिल्या सुवर्ण कमळाचा मानकरी ठरलेला चित्रपट ‘श्यामची आई’ पासून ‘नाळ ’पर्यंतच्या चित्रपटांचा हा पल्ला प्रदीर्घ आहे. लहान मुलांना काहीच समजत नाही, हा गैरसमज लहान मुलांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत कधीच गळून पडलाय, कारण याच चित्रपटांतून मिळणारी मूल्य आणि निखळ मनोरंजन केवळ अमूल्य आहे.
अधिक वाचा : फिल्म ‘झुंड’ का प्री-प्रोडक्शन के लिए १५ नवंबर को सदी के महानायक “अमिताभ बच्चन” नागपुर में