नागपूर : अवनी किंवा टी-१ वाघिणीचा मृत्यू होऊन सुमारे एक आठवडा होत आला असला तरी त्यावरून निर्माण होणारे वाद संपण्याची चिन्हे नाहीत. या वाघिणीची शिकार केल्याच्या निषेधार्थ नागपुरात पुन्हा एकदा आंदोलन केले जाणार आहे. येत्या रविवारी, ११ नोव्हेंबर रोजी संविधान चौकात निदर्शने केली जाणार आहेत.
पांढरकवडा आणि राळेगात तालुक्यात १३ मनुष्यबळी घेणाऱ्या टी-१ वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या कारवाईनंत राज्यात सगळीकडे मोठा वादंग निर्माण झाला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यातील वादामुळे हे प्रकरण अद्यापही गाजते आहे. पर्यावरणप्रेमींनीदेखील या कारवाईवरून वनविभागाला टीकेचे लक्ष्य केले आहे. आता नागपुरात याच मुद्द्यावरून निदर्शने केली जाणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी संविधान चौक येथे ही निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर महाराजबाग ते संविधान चौक या मार्गावर रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. वन्यजीवप्रेमी संस्था, शैक्षणिक संस्था, स्कूल आणि कॉलेजेसचे विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील तसेच समाजातील इतर घटक या रॅलीत सहभागी होणार आहेत. नागपूरसह विदर्भातील विविध ठिकाणांहूनही वन्यजीवप्रेमी या निदर्शनांसाठी नागपुरात येणार आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व उच्चपदस्थांना शिक्षा व्हावी. तसेच अवनी प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी केली जावी, अशी मागणी या निदर्शनांचे आयोजन करणाऱ्या विविध संस्थांनी आणि वन्यजीवप्रेमींनी केले आहे.
अधिक वाचा : रेल्वे स्थानकांवर फडकणार राष्ट्रध्वज