नागपूर : ऐन दिवाळीत उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ चा प्रकोप वाढला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये नागपूरच्या विविध रुग्णालयांत या आजाराने चार जणांचे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यातील तीन रुग्ण हे नागपूर जिल्ह्य़ातील आहेत. रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून त्यांनी सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वसंतराव रामटेके (६७) रा. अयोध्यानगर (नागपूर), सैदा बेगम अब्दुल रहेमान (५८) रा. कश्चम कॉलनी, शांतीनगर (नागपूर), मधुकर पाटील (६८) रा. वाडी (नागपूर), किशोर पवार (५६) रा. श्याम नगर (अमरावती) असे चारही दगावलेल्या रुग्णांचे नाव आहे. चारही रुग्णांना सर्दी, खोकला, तापासह इतर त्रास सुरू झाल्यावर नातेवाईकांनी प्रथम जवळच्या दवाखान्यात दाखवले. उपचारानंतरही आराम पडत नसल्याने यातील तिघांना खासगी रुग्णालयात व एकाला मेयोत दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव्याच्या नमुन्याच्या तपासणीत त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. शेवटी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू गेल्या सात दिवसांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोंदवले गेले आहेत.
या मृत्यूंमुळे नागपूर विभागातील १ जानेवारी २०१८ पासून आजपर्यंतच्या स्वाईन फ्लू बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे, तर या काळात आढळलेल्या रुग्णांची संख्याही १०९ झाली. हा आजार रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांमध्ये झपाटय़ाने पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवाळीत काळजी न घेतल्यास हे रुग्ण आणखी वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा : नागपूरात दोन महिला पोलिसांना मारहाण