मुंबई : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा मागच्या निवडणुकांच्या वेळी देण्यात आली. हीच घोषणा २०१९ मध्येही सत्यात उतरू शकते असा अंदाज व्यक्त होतो आहे. कारण निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. महाराष्ट्रात काय होणार? सत्ता बदल होईल की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात सीव्होटरच्या माध्यमातून एक सर्वे घेण्यात आला. या सर्वेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा बहुतांश लोकांनी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती दिली आहे. सर्वात सक्षम नेता म्हणून १९.३ टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच कौल दिला आहे. तर शरद पवार यांना १८.७ टक्के लोकांनी कौल दिला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला ११.८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर राज ठाकरेंना ९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं २५.५ टक्के मतदारांनी म्हटलं आहे. ३१. ९ टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस यांचा कारभार काही प्रमाणात समाधानकारक वाटतो. तर ४१ टक्के लोक त्यांच्या कारभारावर मुळीच समाधानी नाहीत. मराठा बांधवांनी मूक मोर्चाच्या माध्यमातून आपला हुंकार या सरकारविरोधात नोंदवला होता. त्यासंदर्भातही या सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. विद्यमान सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल असं फक्त २६.६ टक्के लोकांना वाटतं आहे. तर ६१.५ टक्के लोक हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असं म्हटलं आहे.
अधिक वाचा : दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ – नरेंद्र मोदी