नागपूर : महा मेट्रो नागपूर तर्फे हिंगणा मार्गावरील ‘लिटील वूड’ येथे निर्मित ‘सेफ्टी पार्क’ अशाप्रकारचा देशातील पहिला पार्क असल्याचे केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले. यापासून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांना देखील अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन गुरुवारी केले.
मिश्रा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. लिटील वूड जवळ ६०० चौरस फूट क्षेत्रफळावर सेफ्टी पार्क तयार करण्यात आला आहे. येथील तीन षटकोनी संरचना वेगवेगळ्या उद्देशाने कार्य करेल. येथे उभारण्यात आलेल्या संरचना प्रकल्पाचे कार्य सुरू असलेल्या ठिकाणी हलवता येते. शासकीय आणि अशासकीय कर्मचारी, शाळा-महाविद्यलयीन विद्यार्थी, व्यावसायिकांना आणि इतर सर्व नागरिकांना या सेफ्टी पार्कमध्ये बांधकामाशी संबंधित सर्वसुरक्षा नियमाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकामाकरिता आवश्यक अनेक उपकरणाचे मॉडेल येथे ठेवण्यात आले आहे. सुरक्षेसंबंधित मॉडेल प्रशिक्षण संस्था म्हणून हा पार्क काम करेल. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर सर्व नागरिकांसाठी या सेफ्टी पार्कचा उपयोग होणार आहे.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, दिल्ली मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह, चेन्नई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार बंसल, मेगा मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आय.पी. गौतम, लखनऊ मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव, एनसीआरटीसी मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार सिंह, नागपूर मेट्रोचे संचालक(प्रकल्प) महेश कुमार,नागपूर मेट्रोचे संचालक(वित्त) एस. शिवमाथन, नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
अधिक वाचा : ‘चला नागपूर’ उपक्रमाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ