नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना अधिक सक्षम आणि गतिमान बनविण्याच्या दृष्टीने शाळा निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शाळा निरीक्षकांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षकांच्या कार्याचा अहवाल शिक्षण समिती आणि विभागाला द्यावा. जे शिक्षक शिक्षणकार्यात कुचराई करीत असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका शाळांच्या शिक्षण कार्यातील गतिमानतेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) शिक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात करण्यात आले होते. सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीच्या उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, उपशिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.
यावेळी सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शाळा निरीक्षकांकडून त्यांच्या कार्याचा झोननिहाय आढावा घेतला. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत संचालित सर्व शाळांमध्ये शिक्षण साहित्य व्यवस्थित आहे अथवा नाही, शिक्षकांचे कार्य योग्यरीत्या आहे अथवा नाही, शिक्षक टाचणवह्यांची नोंद ठेवतात की नाही, शिक्षकांच्या मासिक नोंदी, वार्षिक नियोजन आहे अथवा नाही, त्यावर शाळा निरीक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत की नाही, या सर्व बाबींचा आढावा घेतला. दैनंदिन कामे करण्यात जो शिक्षक कुचराई करीत असेल, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.
समिती सदस्य करणार शाळांची तपासणी
मनपाच्या शाळा अधिक गतीमान करण्यासाठी आता सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्यासह प्रत्येक सदस्य हे संबंधित झोनच्या शाळा निरीक्षकांसह विविध शाळांना आकस्मिक भेटी देणार आहेत. या भेटीत ते शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेतील. त्यांची दैनंदिन कामे योग्यरीत्या होतात अथवा नाही, याचीही ते तपासणी करतील. शाळा साहित्य, शालोपयोगी वस्तू योग्यरीत्या असल्याची खातरजमाही ते या भेटींमध्ये करणार आहेत.
शिक्षण सप्ताहात होणार क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षी बालदिनाचे औचित्य साधून शिक्षण सप्ताहाचेही आयोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात येते. यावर्षी बालदिनाला शाळास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण सप्ताहादरम्यान करण्यात यावे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात त्याचे आयोजन करून याच वेळी गुणवंत सत्कार सोहळा घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
अधिक वाचा : गरजू नागरिकांसाठी उपराजधानीत ‘अटल आरोग्य महाशिबीर’