नवी दिल्ली: नेहमीच, घरोघरी दिसणारी टीव्ही च्या रिमोटवरून होणारी भांडणं तशी काही नवीन नाहीत. नवरा-बायको आणि भावंडांमध्ये ती नेहमीच होतात. पण, अशाच एका भांडणाला दुर्दैवी वळण लागल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे. भावाशी रिमोटवरून भांडण झालं म्हणून एका 12 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
ही घटना दिल्लीच्या सीलमपूर येथे घडली. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आई-वडिलांच्या गैरहजेरीत ही मुलगी आणि तिचा 7 वर्षांचा भाऊ टीव्ही बघत होते. तिला तिचा आवडता कार्यक्रम बघायचा होता, म्हणून तिने त्याच्याकडे रिमोट मागितला. मात्र, भावाने तिला रिमोट देण्यास नकार दिला. त्यावरून त्या दोघांचं भांडण सुरू झालं. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीत अभ्यास करणारा त्या दोघांचा मोठा भाऊ बाहेर आला. त्याने मध्ये पडत भांडण सोडवलं आणि पुन्हा असं करण्याबद्दलही बजावलं. तासाभराने मुलीने पुन्हा भावाकडे रिमोट मागून पाहिला. पण तेव्हाही त्याने तिला रिमोट दिला नाही. त्यावर चिडलेल्या मुलीने त्याला थोबाडीत मारलं आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. बहिणीने मारल्यामुळे त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी लहान भाऊही तिच्यापाठी धावला.
मात्र, तोपर्यंत मुलीने खोलीचं दार बंद केलं होतं. तिने दार उघडावं म्हणून त्याने दार वाजवून पाहिलं. तिला हाकाही मारल्या. पण बराच वेळ तिने दार उघडलं नाही. त्यामुळे त्याने हा प्रकार मोठ्या भावाला सांगितला. मोठ्या भावाने मोठ्या प्रयत्नांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याशी लटकत होती. त्याने ताबडतोब तिला खाली उतरवलं आणि आई-वडिलांना या घटनेची माहिती देत तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथे तीन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.