जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार – देवेंद्र फडणवीस

Date:

नागपूर : देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरु असून जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. यामध्ये 500 किलोमीटर रस्ते वर्धा जिल्ह्यातील असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) यांच्या वतीने हिंगणघाट येथील टाका मैदान येथे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हिंगणघाट येथील 1.15कि.मी लांबीच्या रेल्वे उड्डाणपूलाचे, 29 कि मी लांबीच्या वडनेर ते देवधरी (रा.म 44) मार्गाचे चौपदरीकरण, 22कि.मी लांबीच्या केळापूर ते पिंपळखुटी मार्गाचे चौपदरीकरण (रा.म 44) या वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदगाव चौक येथील उड्डाणपूल, वर्धा ते हिंगणघाट मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण, सेलडोह सिंदी रेल्वे-सेवाग्राम पवनार मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण, वर्धा-आर्वी मार्गाचे काँक्रिटसह दुपदरीकरण, आर्वी ते तळेगाव मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण व चौपदरीकरण, तळेगाव गोनापूर मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचा कार्य अहवाल-डिजिटल विकास पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्याचे समग्र चित्र पालटते आहे. विविध योजनांची कामे जिल्ह्यात व हिंगणघाट येथेही वेगात सुरू आहेत. रस्ते विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे ही बाब हिंगणघाटवासियांसाठी तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायी आहे. राज्यात महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. चार वर्षात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. चार वर्षात वीस हजार किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली. 4 हजार किलोमीटर राज्य महामार्ग व 30 हजार किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून जूनपर्यंत 30 हजार किलोमीटरपर्यंतचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये पाचशे किलोमीटरचे रस्ते वर्धा जिल्ह्यातील आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून रोजगार निर्मितीत वाढ होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 पर्यंत राज्यात 50 लाख शौचालये होती. 2015 ते 2018 या तीन वर्षात 60 लाख शौचालये बांधण्यात आली. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही असा निर्धार असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जूनपर्यंत साडेदहा लाख कुटुंबांना घरे देण्याचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शेतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक संकटांवर मात करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत उभे आहे. राज्यात यंदा काही भागात पर्जन्यमान कमी झाले. 180 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत देण्यात येत आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाच्या झालेल्या विविध कामांमुळे शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे आढळून येत आहे. शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली, कर्जमाफी देण्यात आली. तीन वर्षात साडेआठ हजार कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली. विदर्भातील सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील. अमरावती येथील टेक्स्टाइल पार्कप्रमाणेच विदर्भात अन्यत्रही टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. सिंदी येथील ड्राय पोर्ट तसेच समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे पालटणार आहे. गावाच्या व शहराच्या विकासासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच विदर्भातील नझुल जमिनींच्या संदर्भातील प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले, वर्धा येथील विविध विकास कामांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानुसार कामे सुरू झाली व काही कामे पूर्ण झाली आहेत. देशात रस्ते विकासाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. वर्धा ते तुळजापूर चार पदरी रस्ता होत असून विविध विकासकामे साकारताना ती पारदर्शक व दर्जेदार करण्यात येत आहेत. हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले असून जांब येथे उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. देशात व राज्यात सर्वच क्षेत्रात समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे.

स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी सिंदी ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहे. याद्वारे आयात निर्यातीस चालना मिळणार आहे. येथे ब्रॉडगेज रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना उभारण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याची सिंचनक्षमता 50 टक्क्यांवर नेण्याचा मानस असून जलयुक्त शिवार अभियान राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. 108 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून याद्वारे सिंचनक्षमता नक्कीच वाढेल. राज्यात ब्रिज कम बंधाऱ्यांची कामेही वेगात सुरू आहेत. अमरावतीप्रमाणेच विदर्भात अन्य ठिकाणीही टेक्स्टाईल झोन उभारणारण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही केंद्रीय परिवहनमंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.

अधिक वाचा : हँडीक्रॉप्ट, ज्वेलरी व फॅशन गारमेंटस, लाईफस्टाईल प्रदर्शनी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...