नागपूर : टाटा ट्रस्टच्या साहाय्याने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संचालित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कात टाकत आहेत. कर्मचारी तेच आहेत. फक्त त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आरोग्य केंद्र अत्याधुनिक होत असतानाच कर्मचाऱ्यांची रुग्णांप्रति वागणूक बदलली की रुग्णांचाही दृष्टिकोन बदलतो. रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन हेच आपले यश असल्याचे प्रतिपादन मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून नागपुरात साकारण्यात आलेल्या आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदरमधील हॉटेल एल.बी. येथे सोमवारी (ता. २२) आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर आयुक्त राम जोशी, मुख्य प्रशिक्षक डॉ. सतीश जयराम, श्री. अरुलमानी, डॉ. मिना सिन्हा, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राने कात टाकली आहे. आरोग्य केंद्र अत्याधुनिक झाले आहे. शासकीय रुग्णालयांकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलला आहे. आता ही सेवा, ही स्वच्छता कायम राखण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. कौशल्य प्रशिक्षणाचा माध्यमातून कर्मचाऱ्यांचाही सेवेकडे आणि रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल यात शंका नसल्याचे सांगत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अपर आयुक्त राम जोशी म्हणाले, मनपाच्या बदललेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची केवळ रंगरंगोटीच झाली नाही तर येथील सेवेचा दर्जाही उंचावला आहे. आपण स्वत: रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी संवाद साधून माहिती घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधानाचे भाव हे आपण केलेल्या बदलाचे यश आहे. याबद्दल त्यांनी टाटा ट्रस्टचे आभार मानले.