मुंबई: आपत्कालिन परिस्थितीमध्ये राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अवघ्या काही वेळात पोहचणारी १०८ रुग्णवाहिकेची सेवा शुक्रवारपासून कोलमडण्याची शक्यता आहे. भारत विकास ग्रुपतर्फे (बीव्हीजी) चालवण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिका सेवेतील चालक व डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत.
बाराऐवजी आठ तास काम, वेतनवाढ व वेतन करार, पीएफ, ईएसआयसी व सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, अपघाती विमा व कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर व डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन, पोलिस अधीक्षक, सर्व महापालिकांचे आयुक्त यांना २८ सप्टेंबरला पत्र पाठवून कळवण्यात आल्याचे महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी सांगितले. बीव्हीजी व्यवस्थापनाने बोलावल्यास आमची चर्चेची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागण्या अवास्तव असून व्यक्तिगत फायद्यासाठी काहीजण हा प्रकार करत आहेत, असे बीव्हीजीचे उपाध्यक्ष उमेश माने यांनी सांगितले.
अधिक वाचा : पेट्रोल-डिझेलनंतर वाहनांचा इन्शुरन्स महागला!