केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक ५ पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याने पटकाविले आहेत. दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. यात अगदी गाव पातळीपासून पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी क्षेत्रिय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्राला एकूण १४ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ५ महिलांना वैयक्तिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
१० ऑक्टोबरला पुरस्कार वितरण
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने १० ऑक्टोबरला येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राला स्वच्छ कँपस रॅंकिंगचे तीन पुरस्कार