लखनऊ – उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री उशीरा आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना लखनौमध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री घडली. एका चेक पोस्टवर पोलिसांनी त्याची एसयूव्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने नकार दिला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला गुन्हेगार समजून गोळ्या झाडल्या. गाडी चालवणाऱ्याचे नाव विवेक तिवारी (38) असे होते. तो अॅपल कंपनीचा एरिआ मॅनेजर होता.
विवेकला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर आपल्या माजी सहकाऱ्यासोबत येत होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले. परंतु, तिवारी काही थांबला नाही. यानंतर बाइकवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांना सुद्धा त्याने धडक दिली.
पोलिस काँस्टेबल प्रशांत कुमार यांनी तिवारीवर फायरिंग केली. “कुमार यांनी सांगितले, की त्यावेळी पथदिवे बंद होते आणि रस्त्यावर खूप आंधार होता. त्याचवेळी आम्ही एका एसयूव्हीजवळ पोहोचलो. कार थांबलेली होती. आम्ही आमची बाइक कारच्या थेट समोर लावली. त्याचवेळी अचानक ड्रायव्हरने कार सुरू केली आणि आमच्या बाइकला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्याने कार रिव्हर्स घेतली आणि पुन्हा आम्हाला धडक दिली. यानंतरही आम्ही त्यांना बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा पुन्हा फुल स्पीडने ड्रायव्हरने कार रिव्हर्स घेतली आणि आणखी जोरदार धडक दिली. मी खाली पडलो होतो. यानंतर त्याला भीती दाखवण्यासाठी मी पिस्तुल बाहेर काढली. हे पाहून त्याने परत गाडी माझ्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आत्मरक्षणासाठी मला फायरिंग करावी लागली.”
अधिक वाचा : आधार कार्डला घटनात्मक ‘आधार’; बँक-मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द : सर्वोच्च न्यायालय