नागपूर : ताजबागमध्ये ३ ऑक्टोबरपासून उर्स सुरू होत आहे. देशभरातून लाखो भाविक उर्समध्ये सहभागी होत असतात. त्यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा शुक्रवारी (ता.२८) महापौर नंदा जिचकार यांनी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात घेतला.
बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपातील सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, नेहरूनगर झोन सभापती राजेश कराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, ताजबागचे प्रशासक जी.एम.कुबडे, सचिव अब्दुल रज्जाक ताजी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ताजबाग परिसरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त उर्स कालावधीत दोन हजार लिटर क्षमतेच्या एकूण आठ पी.व्ही.सी. पाण्याच्या टाक्या विविध ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय विभागाकडून देण्यात आली. उर्स कालावधीत भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता दररोज एकूण ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्नावर बोलताना महापौरांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या, असे आदेश दिले.
स्वच्छता विभागाद्वारे महिला व पुरूषांसाठी प्रत्येकी ५० अस्थायी स्वरूपाचे शौचालय बांधण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली. याव्यतिरिक्त चार मोबाईल शौचालयाची व्यवस्था परिसरात करण्यात येणार आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दोन ठिकाणी ओपीडीची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. उर्स दरम्यान ३, ७ आणि १० ऑक्टोबरला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असणार असल्याची माहिती ताजबाग प्रशासनाद्वारे देण्यात आली.
विद्युत विभागाद्वारे परिसरात १८० हॅलोजन व पाच जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरातील रस्त्यांवरचे पथदिवे सतत सुरू ठेवण्याकरिता आवश्यक कार्यवाही सुरू आहे. उमरेड महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल यांनी दिली.
आरोग्य विभागाद्वारे परिसरात २४ तास दोन रूग्णवाहिका तैनात राहणार आहे. यासोबतच डॉक्टर्सची चमू तीन शिफ्टमध्ये राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वजय जोशी यांनी दिली. यावेळी भाविकांसाठी नि:शुल्क औषधेसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उमरेड रोडवरील रस्त्यावर असलेल्या खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, असेही नर्देश महापौर नंदा जचकार यांनी दले.
अधिक वाचा : डेंग्यूच्या नावावर पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा!