विदर्भ क्रिकेट संघाची पराभवाची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात विदर्भ क्रिकेट संघाला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला तोंड द्यावे लागले आहे. हिमाचल प्रदेश विरुद्धच्या लढतीत विदर्भ संघाला ४ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तीन सामन्यानंतरही विदर्भाला गुणांचे खाते उघडता आलेले नाही. या लढतीत विदर्भाचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडेची १४८ धावांची खेळी व्यर्थ ठरली. तर नाबाद १७३ धावांची खेळी करणारा हिमाचलचा अंकूश बंस संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. चार लढतीत विदर्भाचा हा तिसरा पराभव असून मुंबई विरुद्धचा सामना पावसाने रद्द करावा लागला होता.
बंगळुरुच्या अलूर मैदानावर एलिट ए ग्रुपमधील लढतीत हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकत विदर्भाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विदर्भाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवर जितेश शर्मा केवळ १० धावा काढून बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार फैज फजल व अथर्व तायडे यांनी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी १७३ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान शतकापासून नऊ धावा दूर असताना फैज ९१ धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत ७ चौकार व चार षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे अथर्व तायडेने शतक पूर्ण केले. दरम्यान दुसऱ्या बाजूने गणेश सतीश १२ आणि उमेश यादव १६ धावा सोडल्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अथर्वच्या १४८ धावांच्या नाबाद शतकी खेळीत १० चौकार व चार षटकारांचा समावेश होता. विदर्भाने निर्धारित ५० षटकात ७ बाद २९७ धावा केल्या. हिमाचलकडून गलेतिया आणि जामवालने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात हिमाचलच्या डावाची सुरुवातही डळमळीतच झाली. १५ धावांवर कर्णधार पी एस चोपडाला आदित्य ठाकरेने बाद केले. दरम्यान त्यानंतर खंडुरी आणि बंसने दमदार फलंदाजी करत तब्बल १७२ धावांची भागीदारी केली. खंडुरी ६३ धावांवर बाद झाला. मात्र, बंसने विदर्भाच्या गोलंदाचा समाचार घेत १३९ चेंडूत तब्बल १७३ धावांची खेळी केली. यात तब्बल १२ चौकार व ९ षटकारांचा समावेश होता. बंसच्या या खेळीने हिमाचलने ४७.५ षटकात सहा गडी गमावत २९८ धावांचे लक्ष्य गाठत विजय मिळवला. विदर्भाकडून अक्षय वखरे दोन, तर गुरबानी, ठाकरे, यादव आणि जांगिड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने विदर्भाला स्पर्धेतील पुढची वाटचाल खडतर झाली आहे.
अधिक वाचा : रोहित-शिखरनं मोडला सचिन-सेहवागचा विक्रम