उपराजधानीत आयुर्वेद औषधांमध्ये अॅलोपॅथी औषधांचे मिश्रण करून ते विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तीन वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईतून ही बाब पुढे आली. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुरेश पशिनेसह इतरांवर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सुरू आहे.
डॉ. सुरेश पशिने यांच्या मालकीच्या गायत्री आयुर्वेदिक औषधालय, सुमन विहार, भिलगांव नाका नं. २, कामठी रोड, जि. नागपूर येथे आयुर्वेद औषध नियमबाह्य़रित्या विकले जात असल्याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली. त्यावरून या विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी २० जानेवारी २०१८ रोजी गायत्री आयुर्वेदिक चिकित्सालय, हिंगणा टी पॉईंट, श्री गायत्री आयुर्वेदिक औषधालय, सुमन विहार, भिलगांव नाका नं. २, कामठी रोड आणि योगेश राऊत यांच्या राहते घरी संत नामदेव नगर, साई मंदिराच्या मागे येथे एकाच वेळी छापे घातले.
यावेळी आयुर्वेद औषधांसोबतच इतर औषधांचे मिश्रण करणारे मशीन व साहित्य जप्त करण्यात आले होते. या औषधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तेथून आलेल्या अहवालात आयुर्वेद औषधांमध्ये अॅलोपॅथी औषधांचे मिश्रण असल्याचे वास्तव पुढे आले. त्यावरून जरीपटका आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात डॉ. सुरेश पशिने, डॉ. प्रियंका गौस्तुभ गुप्ते (पशिने) यांच्यासह त्यांचे सहकारी व या प्रकरणाशी संबंधित विविध औषध विक्रेत्यांविरोधात तक्रार करण्यात आली. त्यावरून या सर्वाच्या विरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार गुन्हे दाखल करण्यात आला. ही कारवाई एफडीएचे (अन्न) सह. आयुक्त डॉ. राकेश तिरपुडे, सहाय्यक आयुक्त पी.एन. शेंडे यांच्या नेतृत्वात डॉ. पी एम. बल्लाळ, नीरज लोहकरे, सतीश चव्हाण, महेश गाडेकर, मोनिका धवड, स्वाती भरडे यांनी केली.
औषधे आली कोठून?
एफडीएला डॉ. सुरेश पशिने यांनी औषधांच्या मिश्रणाबाबत माहिती नसल्याचे सांगत औषध मे. प्रथमेश आयुर्वेदिक एजेन्सी, महाल या दुकानातून घेतल्याचे सांगितले. या दुकान मालकाने ही औषधे मे. आदित्य फार्मास्युटीकल्स, तिरोडा, गोंदिया येथून खरेदी केल्याचा दावा केला, परंतु तिरोडय़ाच्या दुकान मालकाने हे औषध त्यांचे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही औषधे आली कोठून हे पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.
शहरातील इतरही पेढींवर नजर
डॉ. सुरेश पशिने यांच्या विरोधात एफडीएने कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रकारे औषध विक्री करणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. नागरिकांना यबाबत माहिती असेल तर त्यांनी ती एफडीएला द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.
अधिक वाचा : नागपूरांत न्युरो स्पायनल सर्जन्स असोसिएषन ऑफ इंडियाच्या ‘स्पाईन2018’ परिषदेचे आयोजन