दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या हिंदुस्थानी जवानांच्या विशेष पथकातील एक जाबाँज जवान सोमवारी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला आहे. संदीप सिंग असे त्या जवानाचे नाव असून सोमवारी तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे संदीप तेथून सुरक्षित परतलेले मात्र सोमवारी दहशतवाद्यांशी लढा देताना त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी तंगधार जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून काही दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह हिंदुस्थानात घुसखोरी करत असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर 4 पॅरा कमांडोचे पथक आणि लष्कराचे जाट पथक या घुसखोरांना रोखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. संदीप सिंग हे 4 पॅरा कमांडोंचे नेतृत्त्व करत होते.
दरम्यान सीमा रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर संदीप यांनी त्यांच्या साथिदारांना मागे करत स्वत: मोर्चा सांभाळला व पुढे गेले. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमीही झाले मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी पुढे जात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीदरम्यान एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर काही दहशतवादी मागच्या मागे पाकिस्तानात पळून गेले.
संदीप सिंग हे मुळचे पंजाबमधील गुरुदासपूरचे आहेत. २९ सप्टेंबर २०१६ रोजी हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा देखील ते हिस्सा होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे.
अधिक वाचा : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ