राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृह शहरातील शहर बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. बससेवा संचालन करणाऱ्या तीनही कंपन्यांची देणी महापालिकेने थकवल्याने त्यांनी बसेस उभ्या करून ठेवल्या आहेत. एकीकडे कंपन्या प्रवाशांना वेठीस धरत असून दुसरीकडे प्रशासन आणि पदाधिकारी मात्र सुस्त आहेत.
महापालिकेची बससेवा चालवण्याची जबाबदारी आर.के. सिटी बस, हंसा ट्रॅव्हल्स ऑफ स्मार्ट सिटी आणि ट्रायव्हल टाईम या तीन कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांना दर महिन्याला प्रत्येकी ५० ते ६० लाख रुपये द्यावे लागते. आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने दर महिन्याला ही रक्कम देणे महापालिकेला शक्य नाही. तीनही कंपन्यांचे प्रत्येकी १५ कोटी रुपये महापालिकेला देणे आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या कंपन्यांनी शनिवारपासून बससेवा बंद केली आहे.
रविवारी सुटी असल्यामुळे फारसा फरक पडला नाही मात्र, सोमवारी सकाळपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे. शहरातील विविध भागात बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना आता खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. त्यांनीही भाडे वाढवले आहे. आज आगारामधून बसेस बाहेर पडल्या नाहीत. मोरभवनमध्ये आलेल्यांना वाढीव पैसे देऊन खासगी वाहनाने गंतव्य ठिकाणी जावे लागले. तीन कंपन्यांच्या मालकांशी महापालिकेचे अधिकारी चर्चा केल्यानंतर दुपारनंतर बसेस सुरू होतील अशी शक्यता होती.
मात्र, कंपनी किमान प्रत्येकाला ३ कोटी मिळावे यावर ठाम आहे आणि महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता १ कोटीच्यावर देऊ शकत नाही. यामुळे जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत शहरात बस धावणार नाही, असा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. कंपनी आणि महापालिका प्रशासनाच्या या वादात मात्र नागरिकांचे हाल होत आहे आणि पदाधिकारी व अधिकारी मात्र सुस्त आहेत.
अधिक वाचा : गणपती विसर्जन स्थळांना महापौरांची भेट; भक्तांशी साधला संवाद