नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन क्षेत्रात धुमाकूळ घालून अनेकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुध्दीचे इंजेक्शन (डार्ट) मारून पकडण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. मात्र, ते शक्य न झाल्यास शूटर्स तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी बुधवारी दिली.
हल्लेखोर वाघीण सातत्याने आपले वास्तव्य बदलत आहे. सुमारे ८ हजार चौरस किलो मीटरच्या क्षेत्रात वाघिणीचे वास्तव्य शोधणे अत्यंत कठीण ठरत आहे, असे सांगताना मिश्रा यांनी सांगितले की वन विभागाने या संपूर्ण क्षेत्रात ८० कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत. त्यामुळे वाघिणीच्या वास्तव्याची छायाचित्रे मिळत असून त्यांचे विश्लेषणही सुरु आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी वन विभागाचा विदर्भातील फौजफाटा लावण्यात आला आहे. शक्यतोवर वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचेच प्रयत्न राहतील. ते शक्य न झाल्यास शूटर्सही तयार ठेवण्यात आले आहेत. यासाठी हैदराबाद येथील नवाब नावाच्या शूटरची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नेमक्या हल्लेखोर वाघिणीची खात्री करण्यासाठी वन विभागाकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेली छायाचित्रे व पायांचे ठसे या माध्यमातून तिचा माग काढण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वाघिणीला शक्यतोवर पकडण्याचे व ते शक्य न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपवण्याच्या वन विभागाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले होते.
अधिक वाचा : नरभक्षक वाघीण आता शार्पशूटरच्या नेमावर : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश