राज्यातील अपघातांची संख्या चिंताजनक असून याला आळा घालण्यासाठीच प्रस्तावित मुंबई नागपूर समुद्धी महामार्गालगत जवळपास ७०० कि. मी. लांबीची दुतर्फा संरक्षक भिंत उभारली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कोट्यवधी रुपये खर्चून भिंत उभारण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीनमधील ‘ग्रेट चायना वॉल’नंतर महाराष्ट्रात जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत ठरेल. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना यासाठी लागणारे करोडो रुपये उभारण्यासाठी राज्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मूळ प्रकल्प ४९,२४७ कोटींचा असताना आता या प्रकल्पासाठी ६०८८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पाची एकूण किंमत ५५,३३५ कोटी रुपये होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, रस्त्यावरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे जीव वाचल्यास यापेक्षा मोठी दुसरी कोणती गोष्ट नसेल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरून गाड्या सुसाट सुटतात यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढते. मात्र या महामार्गाच्या दुतर्फा ७०५ किमीची म्हणजे एकूण जवळपास १ हजार ४१० किमीची भिंत उभारावी लागणार आहे. या भिंतीमुळे कोणी रस्ता ओलांडण्याचा प्रश्नच उरणार नाही. यामुळे विनाअडथळे १५० प्रतितास किमीच्या वेगाने वेगाने वाहने जाऊ शकतात, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या लागून अनेक व्यावसायिक इमारती, ऑफिसेस उभारली जाणार आहेत.
संरक्षक भिंतीमुळे रस्त्यावरील अतिक्रमण तसेच विनाकारण अडथळा निर्माण करण्याचे प्रकारही थांबतील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ही संरक्षक भिंत जमिनीखाली एक मीटर व जमिनीर दोन मीटर असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५,००० एकर जमिन संपादित केली असून त्यावर अतिक्रमणे येऊ नयेत यासाठीही या भिंतीचा फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे ६०८८ कोटींची घेतलेली सुधारित प्रशासकीय मान्यता ही सिमेंटचे दर वाढल्यामुळे घ्यावी लागल्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले. या भिंतीसाठी १००० ते १२०० कोटींचा अंदाजे खर्च येऊ शकतो. मात्र रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहतुकीला प्राणी वा माणसांमुळे येणारे अडथळे होणारे अपघात व मुख्य म्हणजे अधिग्रहित केलेल्या जमिनीवर रोखले जाणारे अतिक्रमण हे फायदे कितीतरी मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : मिहान च्या जमिनसाठी रिलायन्स ‘वेटिंग’वर