माताभगिनींचा अपमान करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई करावी अशी मागणी करतानाच अन्य पक्षांनीही त्यांना उमेदवारी देऊ नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
भाजपाच्या आमदाराने तारे तोडले असून राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हिनवृत्तीची माणसे आहेत. वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे असे त्यांचे नेते सांगतात. पण हा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राम कदम यांच्या विधानाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का?. मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवत राम कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांना अन्य पक्षांनीही उमेदवारी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम हे तिघेही एकाच माळेचे मणी असून त्यांना माफी म्हणजे वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी हार्दिक पटेलशी मी फोनवरुन चर्चा केली. तो १२ दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. त्याने उपोषण सोडावे असे आवाहन केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हार्दिक पटेल हा लढवय्या असून लढवय्या कधी उपोषण करत नाही, असे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानशी चर्चेची तयारी दर्शवणाऱ्या भाजपा सरकारने हार्दिक पटेलसारख्या देशातील तरुणांच्या म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्याशीही चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणालेत.
अधिक वाचा : भाजप आमदार राम कदम यांचे महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य