नागपूर: गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वच्छतेच्या कार्याला प्रारंभ करा. मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण अथवा अन्य अडथळे तातडीने दूर करा. कृत्रिम विसर्जन कुंड आणि कृत्रिम तलाव सज्ज ठेवा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिले.
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सव तयारीसाठी झोनस्तरावर करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, महेश मोरोणे, हरिश राऊत, अशोक पाटील, गणेश राठोड, राजेश कराडे, सुवर्णा दखने, स्मिता काळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता अनिल कडू आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी तयारीचा झोननिहाय आढावा घेतला. गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी ॲप तयार करण्यात आलेले आहे. यावर परवानगीसाठी किती ऑनलाईन अर्ज आले, ऑफलाईन अर्ज किती आलेत, किती मंडळांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली, याबाबत त्यांनी झोन सहायक आयुक्तांकडून माहिती घेतली. विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी स्वत: सहायक आयुक्तांनी करून त्यामध्ये जर काही अडथळे असतील तर ते तातडीने हटविण्यात यावे, कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याची सुरुवात करण्यात यावी, सार्वजनिक मंडळांना सामाजिक संदेश देण्यासाठी बाध्य करण्यात यावे, कृत्रिम तलावांची झोननिहाय यादी पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात यावी असे निर्देश उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिले. विसर्जनसमयी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या दृष्टीने लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीला अग्निशमन, स्थावर, विद्युत, हॉटमिक्स व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.