यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अनिस पटेल यांनी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिग्रस येथील अनिस पटेल यांची 15 दिवसापूर्वी पुसद इथं नियुक्ती झाली होती. ते सीआरपीमध्ये इंचार्ज होते. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांनी मुख्यालयाच्या भिंतीजवळ स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्त्या केली. त्यांनी आत्महत्या करण्याचं इतकं टोकाचं पाऊल का घेतलं याचं कारण काही अद्याप कळू शकलेलं नाही.
मात्र पटेल हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे आता पोलीस याचा कसून तपास करत आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार धनंजय सायरे करीत आहेत.
सदर घटना पुसद शाहरात वाऱ्यासारखी पसरताच पुसदकरांनी घटना स्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, अनिस पटेल यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे तर या घटनेची माहिती अनिस यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. अनिस यांच्या अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या राहत्या परिसरातही याची हळहळ व्यक्त केली जात आहे.