नागपूर : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ३१५ वर्षांतील सर्वात मोठ्या पुराला अनुभवलेल्या नागपूर जिल्ह्याने येत्या मान्सूनसाठी अतिशय गंभीरतेने तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत कोरोना संसर्ग आणि गेल्यावर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या सर्व ३४१ गावांना कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करा. मान्सून पूर्वतयारीची कामे सात दिवसांत पूर्ण करा, आणि त्यासंदर्भात काय नियोजन केले त्याचा अहवालही सर्व विभागांनी सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.
गेल्या वर्षी २८ व २९ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील चौराई धरणाच्या ग्रहण क्षेत्रात काही तासांमध्ये ४१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे चौराई धरणातून ९८ टक्के भरलेल्या तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. तोतलाडोहचा विसर्ग वाढविणे आवश्यक असल्याने भयानक पूर आला. त्यामुळे या वर्षी मान्सून पूर्वतयारी करताना गेल्यावर्षी जे घडले ते पुन्हा घडणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
बोटी, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित मनुष्यबळ यंत्रसामग्री तपासून तयार ठेवणे, कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने दुर्गम गावांपासून सर्वत्र उपायोजना करणे. वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी जनजागृती मोहीम राबविणे. सर्व मोठ्या मध्यम, लघुप्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परीक्षण करणे. जिल्ह्यातील संपूर्ण ३४१ गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याची सूचना त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट पूल व अर्धवट रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी फलक लावावेत, अपघात प्रवणस्थळांची निश्चिती व्हावी, ज्या पुलाचे काम सुरू असेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उत्तम प्रकारे करण्याचेही त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत राहील, याची व्यवस्था करा आदी निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे नियोजन
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या वर्षीचे सर्व विभागाचे नियोजन पुढील सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने या वर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १५ जूनपर्यंत नागपूरला मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व नियोजन पूर्ण करायचे असून, त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी जिल्ह्यातील पाच मोठ्या व १२ मध्यम प्रकल्पांचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करावे ,यासोबतच लघुप्रकल्प तसेच तलाव, बंधारे याबाबतही काळजी घेण्याचे निर्देश दिले.
सोमवारी मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
सोमवारी मध्य प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात एक बैठक होणार आहे. यावेळी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नद्यांवरील धरणातील पाण्याचा विसर्ग व अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी नागपूर व भंडारा जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- बोटी, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित मनुष्यबळ यंत्रसामग्री तपासून तयार ठेवा.
- कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करा.
- वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी जनजागृती मोहीम राबवा.
- सर्व मोठ्या, मध्यम,लघुप्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परीक्षण करा.
- जिल्ह्यातील संपूर्ण ३४१ गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवा.
- अर्धवट पूल व अर्धवट रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी फलक लावा.
- १ जूनपासून प्रत्येक विभागातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राला अद्ययावत करा.