नागपूर : विभागातील नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील १५५ गांवातील १८० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहे.
नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखरड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या उपाययोजनांद्वारे ९१ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिंरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन तातडीने अंमलबजावणी करावयाच्या १ हजार ९९१ गावातील २ हजार ६४४ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ८४० गावातील १ हजार १५ उपाययोजना प्रगतीपथावर असून २५६ गावातील ४९२ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
टंचाईवर दृष्टीक्षेप
– विभागातील १० तालुक्याला दुष्काळाच्या झळा.
– काटोल, कळमेश्वर, नरखेड, आष्टी, कारंजा, ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा व सिंदेवाही या सात तालुक्यांचा समावेश.
– ४५ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन सवलती लागू.
– नागपूर जिल्ह्यात ११६, वर्धा ५० व चंद्रपुरात ५ टँकरची गरज.
– पाणीटंचाई असलेल्या सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची खंडित वीज जोडण्या पूर्ववत करण्यात सुरुवात.
अधिक वाचा : Despite water crisis, 50 percent of supply to Orange City is ‘NRW’