नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत मंगळवारी ८ ने वाढ झाली. आज वाढलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक ३ रूग्ण अमरावतीत वाढले आहेत. तर, नागपूर, चंद्रपूर आणि अकोला येथील प्रत्येकी एक आणि बुलढाणा येथील २ रूग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूरचा रूग्ण नागपुरात विलगीकरण कक्षात आहे. त्यामुळे आता नागपुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १९ एवढी झाली आहे. बुलडाणा येथील ३२ चाचणी अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले तर ३० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुलडाणा येथे आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ११ एवढी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हे दोन नवे रूग्ण सिंदखेडराजा आणि शेगाव येथील असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
अमरावतीत ३ रूग्ण वाढले
अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात २ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. निधन झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील २४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना पॉझिटिव्ह रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत. अमरावतीत आता कोरोनाबाधित रूग्ण संख्या ४ झाली आहे. अमरावतीच्या कोविड रूग्णालयात काल सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे.
अकोल्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला
एकही कोरोना बाधित रुग्ण नसलेल्या अकोल्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती आता समोर आली. या अकोल्याच्या बैदपुरा भागातील हा पहिला रूग्ण आहे. त्यामुळे अकोलेकरांसाठी आता हा चिंतेचा विषय बनला आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु, एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने बहुतेक लोकांना चिंता नव्हती. परंतु, आज एका रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोला जिल्ह्यातही या कोरोनाच्या महामारीचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Also Read- केंद्राच्या योजनेत फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकही लाभार्थी नाहीत: मुख्यमंत्री