नागपूर: डॉ. अभय बंग यांनी मांडलेल्या कोवळ्या पानगळीच्या अहवालाने विदर्भातल्या जंगलातील शापित नंदनवनाचे वास्तव समोर आले होते. या शापित वनात यात होरपळणाऱ्या कोवळ्या पानगळीचे हुंदके मात्र आता करोनाच्या काळातही पुन्हा एकदा बेदखल होतात की काय असे चित्र निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात नागपूर विभागात २४२६ बालके जन्मल्यानंतर वयाचा पहिला महिना देखील पाहू शकली नाहीत. याच कालावधीत ३५६ कोवळी बालके वर्षाच्या आत मरण पावली.
बाळंतपणा दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे जोखमीच्या गटातील २१७ गरोदर मातांचा मृत्यू ओढवला. यातही राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२४ गरोदर स्त्रीया बाळंतपणानंतर चिमुकल्याचा चेहरा पाहण्यापूरते देखील जगू शकल्या नाहीत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीवरून हे वास्तव प्रकाशात येत आहे.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि सरकारी मनुष्यबळ करोनाच्या व्यवसथापनात गुंतली आहे. यंत्रणेचे सगळे श्रम रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजन, इंजक्शन आणि लसिकरणासाठी खर्च होत आहेत. त्यानुळे अकाली दगाणाऱ्या कोवळ्या कळ्यांचा हुंदकाही कोंडला जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापासून ते ग्रामीण भागातील आशा वर्कर सर्वच जण करोनात व्यस्त आहेत. दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्या, पोषण आहार केंद्रही बंद आहेत. त्यामुळे कमी वजनाची बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणारा पोषण आहारही बंद आहे. पोषण आहारच पोचत नसल्याने ग्रामीण भागातील कुपोषण आणखी गंभीर वळणावर अयण्याची भिती व्यक्त होत आहे.
आकडे बोलतात नागपूर जिल्ह्यात एकूण अर्भक मृत्यू ८८६ इतके झाले असून १३५ बालमृत्यू तर, १२४ मातामृत्यू झाले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ४७४ अर्भकमृत्यू, ६३ बालत्यू आणि ३३ मातामृत्यू झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ३७६ अर्भक मृत्यू, ४२ बालमृत्यू आणि १७ मातामृत्यू झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात २८८ अर्भकमृत्यू, ५२ बालमृत्यू आणि १६ मातामृत्यू झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात २३७ अर्भक मृत्यू, ४० बालमृत्यू आणि १० मातामृत्यू झाले आहेत. तर, वर्धा जिल्ह्यात १६५ अर्भकमृत्यू, २४ बालमृत्यू आणि १७ मातामृत्यू झाले आहेत.
- वर्षभरात झाले ३५६ बालमृत्यू
- पूर्व विदर्भात २१७ मातांनी गमावले प्राण
- जन्मानंतर महिनाभरही जगली नाहीत २४२६ बालके
- सरासरीने दररोज ६ बालके मृत्यूपंथाला
- नागपूर जिल्ह्यात ८८६ अर्भकांचा मृत्यू
- रोज दोन नवजातांनी गमावला जीव