राजस्थान : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या वडिलांच्या चितेवर ३४ वर्षाच्या मुलीने उडी मारली. या दुर्दैवी घटनेत मुलगी गंभीररित्या भाजली आहे. ही घटना राजस्थानमधील बारमेर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्यावडिलांना कोरोनाची लागण झाली होती.
राजस्थानातील बारमेर जिल्हातील ७३ वर्षाच्या दामोदरदास शारदा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येत होते. दरम्यान, त्यांच्या तीन मुलींपैकी सर्वात लहान मुलगी चंद्रा शारदा यांनी अचानक वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. ही माहिती पोलिसांनी दिली. ते पुढे म्हणाले की लोकांनी तिला बाहेर काढले पण, तोपर्यंत ती ७० टक्के भाजली होती. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुढच्या उपचारासाठी जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
याबाबत महिती देताना कोतवाली पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर प्रेम प्रकाश यांनी सांगितले की ‘दामोदरदास शारदा यांना तीन मुली होत्या. त्यांच्या पत्नीचे काही काळापूर्वीच निधन झाले होते. तीन मुलींपैकी सर्वात लहान मुलीने वडिलांचे अंत्यविधी सुरु असतानाच वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली.’
दामोदरदास शारदा यांना रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचे मंगळवारी निधन झाले. पोलिसांनी सांगितले की त्यांच्या सर्वात लहान मुलीने अंत्यविधीसाठी येण्याची विनंती केली होती.