नागपूर : पुलवामा येथील दलीपोरा येथे सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवाम्यातील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाली. यानंतर आज पहाटे जवानांनी या भागाला घेरले. जवानांनी शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या रविवारी काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती. त्या वेळी दोन दहशतवादी ठार झाले होते. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.
या पूर्वी १० मे या दिवशी दहशतवादी संघटना आयएसजेकेचा कमांडर इशफाक अहमद याला सोपोर येथील चकमकीत ठार झाला होता. मे महिन्यातच इमाम साहब गावात चकमकीत बुरहान वानी गटाचा शेवटचा कमांडर लतीफ टायगर याला ठार मारण्यात आले होते. हिजबुल कमांडर लतीफ आपल्या अन्य दोन साथीदारांसह एका इमारतीत लपून बसला होता. या वेळी झालेल्या चकमकीत लतीफसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. या चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला होता.
अधिक वाचा : टुल्लु पंप वापरणाऱ्यांवर १६ मे पासून कारवाई : मनपा आयुक्तांनी घेतला पाणीसमस्येचा आढावा