नागपूर : राज्याच्या गृह विभागाकडून आपत्कालीन सेवांसाठी आता ११२ ही केंद्रीभूत यंत्रणा विकसित करण्यात येत असून त्याचे केंद्र मुंबई व नागपुरात असणार आहे. येणाऱ्या गणराज्य दिनी या सेवेच्या उद्घाटनाची शक्यता आहे.
उपराजधानीतील ११२ आपत्कालीन सेवेची जबाबदारी आतापर्यंत पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे होती. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लकडगंज पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर या केंद्रासाठी जागा देण्यात आली आहे.
या केंद्राची रचना महिंद्रा डिफेन्स या कंपनीद्वारा करण्यात येत आहे.मुंबई व नागपुरात हे केंद्र राहणार आहेत. प्राथमिक केंद्र मुंबईत राहणार असून केंद्राची क्षमता एकूण ७० टक्के कॉल्सची आहे. ७० टक्के कॉल्स व्यस्त असल्यास दुय्यम केंद्र नागपुरात असणार आहे. केंद्रांमध्ये भ्रमणध्वनी करणाऱ्यांशी बोलून संबंधित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला (डीसीआर) दिली जाईल. डीसीआरमधून नजीकच्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती पुरवली जाईल. पाच मिनिटात संबंधितांपर्यंत मदत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
‘लाईव्ह लोकेशन’ मिळेल
तक्रारदार किंवा पीडिताने ११२ वर संपर्क साधताच ते कोणत्या ठिकाणाहून संपर्क करीत आहेत, याचे लाईव्ह लोकेशन पीसीसीला मिळेल. पीसीसी ती माहिती डीसीआरला वर्ग करेल. महिंद्रा डिफेन्सकडून मदतीसाठी वाहने आणि दुचाकींसह टॅबचाही पुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनात टॅब असणार आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू
उपराजधानीतील पीसीसी केंद्रात भ्रमणध्वनी स्वीकारण्यासाठी २६ प्रशिक्षित पोलिसांची आवश्यकता आहे. त्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येत असून पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. या आपत्कालीन सेवेमुळे घटनास्थळी पोहोचण्याचा पोलिसांच्या वेळेत सुधारणा होईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी दिली.