जळगाव: बेपत्ता झालेल्या नातीला शोधून हताश झालेल्या एका आजोबाला जळगाव पोलिसांनी त्यांची नात उत्तर प्रदेशमधून शोधून स्वाधीन केली आहे. दीड वर्षांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून धोबीवाडा येथून एक ११ वर्षांची चिमुकली गायब झाली होती.
नात गायब झाल्यानंतर आजोबा भिमसिंग कोळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शाळेत गेल्यानंतर ११:३० वाजेच्या दरम्यान एका रिक्षावाल्याने ट्विंकलचं अपहरण केलं. नात घरी न आल्याने आजोबा शोध घेत होते.
आजोबांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली होती. मात्र नात ट्विंकल सापडली नाही. जळगावमधील ट्विंकलची आईही हरवली होती. यानंतर आजोबांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तपास केला मात्र त्यांनाही यश आले नाही. आजोबांना नातीची आठवण नेहमी यायची. नातीच्या आठवणीने आजी तर आजारीच पडली.
२४ एप्रिल रोजी आजोबा भिमसिंग यांना एक फोन आला. फोनवर एक मुलगी बोलत होती. मुलीचा आवाज आजोबांनी ओळखला. आपली नात ट्विंकलचं असल्याचं त्यांना समजलं. यानंतर आजोबांना खुप आनंद झाला.
आजोबांना ट्विंकल म्हणाली, उत्तर प्रदेशमधील गोरखपुर जिल्ह्यातील बडहलगंज येथे मी आहे. मला आणि आईला एका व्यक्तीने फसवून रिक्षातून इथं आणलं आहे. बाबा आईचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाबा माझे कपडे फाटले आहेत. मला चप्पलही नाही. हे ऐकताच आजोबा भिमसिंग ढसा ढसा रडू लागले.
भिमसिंग यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने भिमसिंग यांना घेऊन उत्तर प्रदेश गाठलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बडहलगंज येथे पोलिसांचे पथक गेले. या ठिकानी ट्विकल पोलिसांना सापडली.
आजोबांना पाहताच ट्विंकलने आजोबाला मिठी मारली. यानंतर उत्तर प्रदेशमधून जळगावच्या धोबीवाडा येथे पोलिसांनी ट्विंकलला आणलं. ट्विंकल सापडल्याने आजीचेही डोळे पाणावले. पोलिसांनी विशेष कामगिरी करत एका चिमुकलीला शोधून काढल्याने त्यांचे कौतूक होत आहे.